
चीन भारताच्या सीमेजवळ जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे, त्याबाबत चिनी भूगर्भशास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या पाठिंब्याने केलेल्या एका अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, ब्रह्मपुत्रा नदीवर १३७ अब्ज डॉलर्स खर्चून उभारला जाणारा 'मेडोग धरण' हा प्रकल्प हिमालयातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एका भागात बांधला जात आहे. चीनच्या सरकारी भूगर्भ सर्वेक्षण संस्थेशी (Geological Survey) संलग्न असलेल्या भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधले जाणारे 'मेडोग जलविद्युत केंद्र' एका सक्रिय 'फॉल्ट लाइन'वर (भूकंपप्रवण भेगेवर) स्थित आहे. यामुळे जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे. हे धरण अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. मेडोग काउंटीमधील या धरणाचा विषय तेव्हा चर्चेत आला, जेव्हा बीजिंग भारताकडे वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवू शकेल का, यावर चर्चा सुरू झाली. भारताने पाकिस्तानसोबतचा 'सिंधू जल करार' स्थगित केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. बीजिंग आणि इस्लामाबाद आपल्या संबंधांचे वर्णन "अढळ आणि सर्व-हवामान मैत्री" (iron-clad, all-weather friendship) असे करतात.