
सावदा (प्रतिनिधी ) : सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले तसेच चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी एकूण १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले असून, संबंधित मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सावदा पोलिस स्टेशनमध्ये मोबाईल हरवल्याबाबत दाखल झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर CEIR (Central Equipment Identity Register) या ऑनलाइन प्रणालीवर संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक टाकून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासातून भुसावळ, जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून मोबाईल शोधून काढण्यात आले.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मोबाईलमध्ये VIVO, Realme, Redmi, Motorola आणि Apple iPhone या कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश आहे. यामध्ये विलास कोळी यांचा २० हजार रुपये किमतीचा VIVO, कमलाकर पाटील यांचा २० हजार रुपये किमतीचा Realme, विनोद जगन्नाथ वाघ यांचा १२ हजार रुपये किमतीचा Redmi, शेख फरहान शेख इरफान यांचा १२ हजार रुपये किमतीचा VIVO आणि प्रशांत जावळे यांचा २० हजार रुपये किमतीचा Motorola मोबाईलचा समावेश आहे. तसेच वाकोला पोलिस स्टेशन, मुंबई येथील प्रॉपर्टी मिसिंगमधील १५ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल आणि ६० हजार रुपये किमतीचे दोन iPhone देखील शोधून काढण्यात आले आहेत.
सदर मोबाईलचे मूळ मालक शोधण्याची प्रक्रिया सध्या सावदा पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स.पो.नि. गणेश पांडुरंग फड, पोलीस अंमलदार पोहेकॉ/मोहसीन पठाण, पोहेकॉ/विनोद तडवी, पोहेकॉ/शकीर मन्सुरी आणि पो.कॉ./मनोज तडवी यांनी मोबाईल शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.