
सावदा प्रतिनिधी :-
३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक गाय व एका गोऱ्ह्यासह ,पिवळ्या रंगाचे टाटा एस वाहन पोलिसांच्या ताब्यात
सावदा, जि. जळगाव : गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर व निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. या कारवाईत एक गाय, एक गोऱ्हा आणि टाटा एस (छोटा हत्ती) वाहन असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहसीन रहमान पठाण व पोलीस कर्मचारी निलेश बाविस्कर हे कर्तव्यावर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सावदा शहरातील ख्वाजा नगर परिसरातील मरीमाता मंदिराजवळून गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने एका वाहनातून अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
पोलिसांनी रात्री सुमारे ८.५० वाजता ख्वाजा नगर परिसरात सापळा रचला. त्यावेळी ख्वाजा नगरकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा एस वाहनाची (क्र. MH.48.AG.5804) तपासणी केली असता वाहनामध्ये एक गाय व एक गोऱ्हा आढळून आला. पोलिसांनी वाहन अडवून पाहणी केली असता गोवंश अत्यंत निर्दयतेने, हालचालीसाठी पुरेशी जागा न ठेवता बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी अदनान शेख शगीर कुरेशी (वय १९, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा, ता. रावेर) आणि निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. प्लॉट भागात, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, सावदा) यांना अटक करण्यात आली.
३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १५ हजार रुपये किमतीची एक तांबड्या रंगाची गाय, वय-८ वर्ष,सुमारे १५ हजार रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा, वय ५ वर्ष तसेच सुमारे ३ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींकडे जनावरांच्या खरेदी-विक्री अथवा वाहतुकीसंदर्भातील कोणतेही वैध कागदपत्र किंवा परवाना आढळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून जनावरांची तपासणी करून घेतली असून, सुटका केलेल्या गोवंशाला सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०२१९/२०२६ अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोहेकॉ मोहसीन पठाण, निलेश बाविस्कर, पोलीस नाईक जाकीर मन्सुरी, सुनील सैंदाणे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस नाईक जाकीर मन्सुरी करीत आहेत.